सांगली प्रतिनिधी । मिरजेत किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी कणकवली येथील माजी आमदार परशुराम प्रभाकर उपरकर यांच्याकडून दहा लाख रुपये उकळून त्यांची फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांनी विरुद्ध मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद उपरकर यांनी दिली आहे. नंद गोपाल आणि वेंकटेश्वर राव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कोकणातील माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. अनेक दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गेल्या काही दिवसापासून उपरकर किडनी प्रत्यारोपणासाठी प्रयत्नात आहेत. 2017 सालच्या जानेवारीपासून ते मिरजेच्या मिशन हॉस्पिटलच्या संपर्कात आहेत, उपरकर नेहमी मिशन हॉस्पिटल आवारात दिसू लागल्याने किडनी प्रत्यारोपण दलालांची नजर उपरकर यांच्याकडे गेली. नंद गोपाल त्याचा सहकारी वेंकटेश्वर राव या दोघांनी उपरकर यांना आपल्या जाळ्यात ओढले. उपरकर यांच्याशी नंद गोपाल याने ओळख वाढवली मी वैद्यकीय व्यवसायात आहे. या क्षेत्रातील मोठ्या डॉक्टरांची ओळख आहे. त्यांच्याशी संपर्क आहे असे भासवले. किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी नंद गोपाल याने उपरकर यांच्याकडून पाच लाख रुपयांची रक्कम आगाऊ घेतली नंतर वेंकटेश राव याला पुढे केले.
व्यंकटेश राव याने उपरकर यांना वेगळ्या ठिकाणी नेले अनेक प्राथमिक तपासण्या करण्याचा बनाव करून पाच लाख रुपयांची रक्कम वेळोवेळी घेतली. त्यानंतरही किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया दोघांनी हाती घेतलीच नाही, तेव्हा उपरकर यांना आपली फसवणूक झाल्याचे जाणवले. त्यांनी त्यांच्याकडे दिलेल्या पैशाची मागणी केली. वारंवार पैसे मागूनही नंद गोपाल आणि वेंकटेश्वर राव यांनी उपरकर यांना दहा लाख परत दिले नाही. अखेर त्यांनी शहर पोलिसात फसवणूक प्रकरणी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी नंद गोपाल आणि वेंकटेश्वर राव या दोन दलालाने विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.