हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. परमबीर सिंह यांच्या निलंबन प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेत त्यांच्या निलंबनाच्या फाइलवर सकाळी स्वाक्षरी केली होती. त्यानंतर आता परमबीर सिंह यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर त्यांच्यावर अटक वॉरंट जारी करण्यात आले. त्यानंतर ते मुंबईत परतले. तसेच खंडणीच्या एका प्रकरणात मुंबई आणि ठाणे पोलिसांसमोर चौकशीसाठी ते हजर झाले. सरकार त्यांच्याविरुद्ध पोलीस सेवा नियमानुसार कारवाई करेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर यांच्या निलंबन फाईलवर सकाळी सही केली होती.
आयएएस अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांनी परमबीर सिंग यांच्यासंबंधी दाखल केलेला अहवाल महाराष्ट्र सरकारने स्वीकारला आहे. परमबीर सिंग यांनी नागरी सेवेच्या नियमाचं उल्लंघन केल्याने देबाशिष चक्रवर्ती यांनी त्यांच्याविरोधात चौकशी केली होती. याशिवाय प्रशासकीय त्रुटींसाठी राज्याच्या गृह विभागाने त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी लावली होती.