मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोरोनाने सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. क्रिकेटविश्वात देखील त्याने धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसमुळे ओडिशा क्रिकेट टीमचे माजी कर्णधार प्रशांत मोहपात्रा यांना आपला जीव गमवावा लागला आहे. ते 47 वर्षांचे होते. त्यांनी आज सकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी एम्स भुवनेश्वरमध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. प्रशांत मोहपात्रा यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले पण त्याचा काही उपयोग झाला नाही असे एम्स भुवनेश्वरचे अधिक्षक डॉ.एस.एन मोहंती यांनी सांगितले आहे.
प्रशांत यांचे वडील आणि राज्यसभा खासदार रघुनाथ मोहपात्रा यांचे देखील 10 मे रोजी कोरोनामुळे निधन झाले होते. तसेच प्रशांत यांचा भाऊ जसबंत यांच्यावरदेखील एम्स भुवनेश्वर रुग्णालयात कोरोनाचे उपचार चालू आहेत. प्रशांत मोहपात्रा यांचा जन्म 1 सप्टेंबर 1973 साली झाला होता. त्यांनी 1990 साली बिहारविरुद्ध रणजी ट्रॉफीत पदार्पण केले होते. तर दुलीप आणि देवधर ट्रॉफीमध्ये ते इस्ट झोनकडून खेळत होते.
प्रशांत यांनी 45 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 30.08 च्या सरासरीने 2,196 रन केले आहेत यामध्ये 5 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बीसीसीआयने मॅच रेफ्री म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. खासदार रघुनाथ मोहपात्रा यांचा जन्म पुरीमध्ये झाला होता. रघुनाथ मोहपात्रा यांना 1976 साली पद्मश्री,2001 साली पद्म भूषण,आणि 2013 साली पद्म विभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले.