पुणे | अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणेचा अधिकारी असून दुबई, अमेरिका आणि भारताची जबाबदारी माझ्यावर असल्याचे सांगत सोशल मिडियाद्वारे झालेल्या ओळखीतून एका फॅशन डिझायनरला 10 लाखांचा गंडा घातला आहे. फसवणूक करणारा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील असून अमित आप्पासाहेब चव्हाण (वय ३०, मूळ रा. पाटण, सध्या रा. एमआयडीसी, बारामती) असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहे. याप्रकरणी धनश्री हासे (वय- २८, रा. बाणेर) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये (एफबीआय) अधिकारी असल्याची बतावणी करून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून एकाने तरुणीचा मोबाईल, लॅपटॉपसह दहा लाख रुपयांची फसवणूक केली आहे. एप्रिल 2021 ते सात जुलैदरम्यान ही घटना घडली. धनश्री हासे या फॅशन डिझायनर आहेत. त्यांची काही दिवसांपूर्वी अमितसमवेत ‘बेटर हाफ’ सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. त्या वेळी संशयिताने त्याचे नाव राहुल पाटील असल्याचे सांगत तो अमेरिकेच्या ‘एफबीआय’मध्ये अधिकारी असल्याची बतावणी केली.
त्यानंतर त्याने फिर्यादीशी ओळख वाढवून त्यांना लग्नाचे आमिष दाखविले. काही दिवसांनी त्याने ‘आम्ही भारतामध्ये तपासासाठी आलो आहोत, तुझ्यावर ‘रॉ’ची नजर आहे’ असे सांगून तिच्याकडून सव्वा लाख रुपये किमतीचा लॅपटॉप, मोबाईल काढून घेतला. त्यातील बँकेसंबंधित गोपनीय माहितीचा वापर करून त्याने तरुणीच्या बँक खात्यातील ८ लाख ३७ हजार रुपये काढून घेतले. एकूण ९ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज नेला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास करून याप्रकरणी चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.