हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वर्षाच्या पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. येत्या १९ ऑगस्टला रक्षाबंधनच्या निमित्ताने हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेमुळे महिलावर्गात आनंदाचे वातावरण आहे. आता या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरवर्षी ३ मोफत गॅस सिलेंडर (Free Gas Cylinder) सुद्धा मिळणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत हे गॅस सिलेंडर महिलांना मिळणार आहेत. त्यासाठी पात्रता निकष काय आहेत ते आपण जाणून घेऊयात…
अन्न व नागरी पुरवठा विभागाने मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील तब्बल 52 लाख 16 हजार पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतंर्गत वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत दिले जातील. यामध्ये आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचाही समावेश झाला आहे. लाडक्या बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी लवकरच जाहीर होईल. त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ राज्यातील किती महिलांना मिळेल ते स्पष्ट होईल. राज्यात सध्या 3 कोटी 49 लाख कुटुंबांकडे घरगुती गॅस सिलिंडर जोडणी आहेत. मात्र, दोन्ही योजनांचे निकष पाहता यापैकी 2 कोटी कुटुंबाना संबंधित योजनेचा लाभ मिळू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
काय आहे पात्रता निकष ?
- या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.
- राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असणार आहे.
- एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल.
- तसेच फक्त १४.२ किलेग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल.