मुंबई प्रतिनिधी | उरी-द- सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट एक दिवस मोफत दाखवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कारगिल युद्धाचा विजय दिवस म्हणून साजरा केला जाणाऱ्या २६ जुलै रोजी हा चित्रपट मोफत दाखवण्यात यावा असे आदेश सर्व चित्रपटगृहांत देण्यात आले आहेत. यासंदर्भात माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहले आहे.
देशाप्रती आणि भारतीय सैन्याप्रती कर्तव्य भावना जागृत होण्यासाठी तरुणांसाठी हा चित्रपट मोफत दाखवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. २६ जुलै २०१९ रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांवर हा चित्रपट १८ ते २५ वर्षांच्या तरुणांसाठी मोफत दाखवला जाणार आहे. जवळपास ४५० चित्रपटगृहात हा चित्रपट दाखवला जाणार आहे.
दरम्यान कारगिल विजय दिवसानिमित्त माजी सैनिक आणि सिनेअभिनेते यांच्यात फुटबॉलचा सामना देखील खेळाला जाणार आहे. हा सामना मुंबईमध्ये पार पडणार असून देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती मध्ये हा सामना रंगणार आहे. तर उरी-द- सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट मोफत दाखवण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्र शासनाने चांगलाच लोकप्रिय निर्णय घेतला आहे अशी भावना सर्व सामान्यातून व्यक्त केली जात आहे.