हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोणता ना कोणता आजार हा प्रत्येक व्यक्तीला होतोच आणि दवाखान्याचा खर्च हा नक्कीच सर्वसामान्य माणसाला परवडत नाही. त्यामुळे अनेकजण आपला आजार अंगावर काढतात आणि त्यामुळे त्रास आणखीच वाढतो . परंतु आता याबाबत चिंता सोडा. कारण येत्या 15 ऑगस्ट पासून महाराष्ट्रातील सर्व सरकारी रुग्णालयात वैद्यकीय सेवा मोफत मिळणार असून राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा निःशुल्क उपलब्ध होणार आहेत. येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टपासून रुग्णांना याचा लाभ घेता येणार आहे. मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आता आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना निःशुल्क उपचार मिळणार आहेत.
सरकारच्या या निर्णयामुळे सर्व उपचार मोफत मिळणार असून सर्व शस्त्रक्रियाही सर्व मोफत असणार आहेत. सरकारी रुग्णालयात इसीजी, एक्स-रे, सिटी-स्कॅन, प्रयोगशाळा चाचण्या यांसारख्या चाचण्यांनी अगदी मोफत करता येणार आहेत. त्यामुळे राज्यातील गरीब जनतेला सरकारच्या या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.