औरंगाबाद – नवीन वर्षात 15 ते 18 वयोगटातील बालकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. 3 जानेवारीपासून हे लसीकरण सुरु होणार असून याकरिता 1 जानेवारीपासून कोविन अॅपवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच 10 जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांना तसेच फ्रंटलाइन वर्कर्सना तिसरा बूस्टर डोस दिला जाणार आहे. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिने झाले असतील तरच हा डोस दिला जाईल, असेही शासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
औरंगाबाद शहरातील सहा तर ग्रामीण भागातील दहा केंद्रांवर लसीकरण केले जाईल. शहरातील क्रांती चौक आरोग्य केंद्र, एमआयटी हॉस्पिटल, राजनगर आरोग्य केंद्र यासह आणखी तीन ठिकाणी ही लस दिली जाईल. तसेच तीन ग्रामीण रुग्णालये आणि पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांसह दहा ठिकाणी लस दिली जाईल, अशी माहिती नोडल ऑफिसर महेश लड्डा यांनी दिली.
राज्यात 15 ते 18 वयोगटातील 60.63 लाख मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. यात नांदेड 1 लाख 81 हजार, जालना 1 लाख 9 हजार, लातूर 1 लाख 34 हजार, उस्मानाबाद 86 हजार, हिंगोली 65 हजार, बीड 1 लाख 42 हजार, परभणी 1 लाख1 हजार, तर औरंगबााद जिल्ह्यात 2 लाख 13 हजार 823 मुलांचे लसीकरण केले जाईल.