जावयाला कंत्राट मिळाल्यानंच राष्ट्रवादीच्या आमदाराचे खदानीला समर्थन? गडचिरोलीतील ग्रामसभांचा शरद पवारांना सवाल

Surjagad Atram Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली : जिल्ह्यातील सुरजागड खाणीतून रोजगार उपलब्ध होत असल्यामुळे सुरजागड लोह खाणीचे समर्थन करतो असे सांगणारे अहेरी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांचे समर्थन खरोखरच आदिवासींना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आहे की आमदाराच्या जावयाला सुरजागड खदानीतील लोहदगड वाहतूक करण्याचे कंत्राट देण्यात आले यासाठी आहे असा सवाल जिल्हा ग्रामसभांमार्फत विचारण्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यातील स्थानिक ग्रामसभांसोबत आहे की जनविरोधी खदान कंपनीच्या बाजूने आहे, हे शरद पवार यांनी गडचिरोली दौऱ्यात स्पष्ट करावे, अशी अपेक्षा जिल्हा महाग्रामसभा स्वायत्त परिषदेने व्यक्त केली आहे.

याबाबत जिल्हा महाग्रामसभा स्वायत्त परिषदेने प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, लोह खाणीमुळे सुरजागड परिसरातील २० हजारांहून अधिक कुटूंबांवर पर्यावरण आणि प्रदूषणाचे संकट ओढवणार आहे. सुरजागड पारंपरिक इलाका आणि लगतच्या वनव्याप्त क्षेत्रातील नैसर्गिक गौण वनोपजातून दरवर्षी निर्माण होणारा १०० कोटी रुपयांहून अधिकचा रोजगार हिरावला जाणार आहे. त्या तुलनेत सुरजागड खाणीतून केवळ एक हजार लोकांना तात्पूरता मजूरीचा रोजगार मिळणार असेल तर एक हजार लोकांच्या रोजगार निर्मितीसाठी वीस हजार कुटुंबांना खदानीच्या दुष्परिणामांचे भोग भोगावे लागणार आहेत. त्यामुळे जनविरोधी लोह खदान ही सरकारची प्राथमिकता कशी काय असु शकते, असा सवालही जिल्हा महाग्रामसभा स्वायत्त परिषदेने उपस्थित केला आहे.

मागील अनेक वर्षांपासून स्थानिक ग्रामसभा सुरजागडसह जिल्ह्यातील २५ बेकायदा खदानी कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी शेकडो निवेदन, पत्र, पारंपरिक सम्मेलने, मोर्चा, आंदोलन करीत असताना आणि मागील विधानसभा निवडणुकीत जनतेच्या खदानविरोधी भूमिकेला समर्थन देण्याचा बहाणा करून निवडून आल्यानंतर भूमिका बदलणाऱ्या स्थानिक आमदाराच्या जावयाला रोजगार मिळाला म्हणजे अहेरी मतदारसंघातील सर्वांना रोजगार मिळाला असे समजायचे काय आणि हजारो कुटुंबांना विस्थापित करणाऱ्या खदानीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केलेले समर्थन हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे काय? हेही गडचिरोली जिल्हा दौऱ्याच्या निमित्ताने गडचिरोलीतील जनतेला शरद पवारांनी सांगावे अशी अपेक्षा आहे, असेही जिल्हा महाग्रामसभा स्वायत्त परिषदेने आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.