पाटणा : वृत्तसंस्था – एका 32 वर्षीय महिलेवर 14 जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या नराधमांनी आधी महिलेचं अपहरण केलं आणि यानंतर तिला नदीच्या किनाऱ्यावर घेऊन गेले. इथे आरोपींनी सर्व हद्द पार करत महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर आरोपींनी पोलिसांना पाहताच आपले कपडे तिथेच सोडले आणि नग्नावस्थेतच ते पळत सुटले. आरोपींनी आपल्या चपलासुद्धा घटनास्थळी सोडल्या आहेत. ही घटना बिहारच्या गया या ठिकाणी घडली आहे.
पीडित महिलेची अवस्था सध्या गंभीर आहे. या महिलेला गयाच्या मगध मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. ही घटना फस्सिल ठाण्याच्या क्षेत्रामध्ये घडली आहे. दोन युवक या महिलेला उचलून आपल्या गाडीवरून फल्गु नदीवर घेऊन गेले. याचठिकाणी आरोपींनी महिलेवर बलात्कार केला. काही वेळानंतर 5 बाईकवर बसून आणखी १२ जण याठिकाणी आले. या सर्वांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. जेव्हा पीडितेनं याचा विरोध केला तेव्हा आरोपींनी तिला जबर मारहाण केली.
हाती आलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला जेव्हा दोन युवक महिलेला घेऊन नदीच्या काठावर आले तेव्हा आसपासच्या गावातील लोकांनी त्यांना पाहिलं. मात्र, अंधार असल्यानं कोणाला काहीच समजलं नाही. काही वेळानंतर जेव्हा गाड्यांवर १२ जण नदीकडे जाताना दिसले तेव्हा गावातील लोकांना शंका आली. यानंतर गावातील काही लोकांनी नदीच्या कडेला जाऊन पाहिल्यानंतर त्यांना या घटनेबद्दल समजलं. यानंतर गावातील लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांना येताना पाहून आरोपी कपडे न घालताच नग्नावस्थेत पळत सुटले. पोलिसांनी आरोपींचे कपडे आणि चपला ताब्यात घेतल्या आहेत. तर, महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या महिलेची अवस्था गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.