सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
वाई येथे हायड्रोपोनिक ग्रो सिस्टीमचा वापर करून कुंड्यामध्ये गांजाची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सर्गीस व्हिक्टर मानका (वय 31), सेबेस्टीन स्टेन मुलर (वय 25 दोन्ही रा. जर्मनी, सध्या रा. नंदनवन कॉलनी, वाई) या संशयितांनी न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर सातारा जिल्हा कारागृहात विवस्त्र होऊन धिंगाणा घातल्याची घटना घडली.
संशयितांनी कारागृहातील पंधरा खोली विभागातील खोली क्रं 5 मध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तसेच शौचालयाच्या दरवाजाची तोडफोड केली. त्यापुढे जात या दोघांनी कारागृह कर्मचारी संदीप फाळके व रमेश ओव्हाळ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद कारागृहातील हवालदार सुरेश पाटील यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी वाई शहरातील नंदनवन कॉलनीतील “विष्णू श्री स्मृती’ या बंगल्यात हायड्रोपोनिक ग्रो सिस्टीमचा वापर करून बंगल्याच्या तीन बेडरूममध्ये, गॅलरीत, टेरेसवर कुंड्यामध्ये गांजाची लागवड केल्याने पोलिसांनी 29 किलो गांजा इतर साहित्य असा आठ लाख 21 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून सर्गीस मानका, सेबेस्टीन मुलर या दोन जर्मन नागरिकांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली होती.
दरम्यान दि.22 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संशयितांनी कारागृह कर्मचारी फाळके व ओव्हाळ या दोघांशी उद्धट वर्तन करण्यास सुरूवात केली. संशयितांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून कारागृहातच विवस्त्र होऊन धिंगाणा घातला. हा प्रकार शांत झाल्यानंतर फाळके व ओव्हाळ हे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पंधरा खोली विभागात गस्त घालत असताना त्यांना पाहून संशयितांनी चिडून जावून पंधरा खोली विभागातील ते बंधिस्त असलेल्या खोली क्रं 5 मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तसेच शौचालयाच्या दरवाजाची तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुजावर करत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.