हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिग्गज काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम करत मोठा झटका दिला आहे. आझाद यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवत आपली नाराजी जाहीर केली आणि काँग्रेस सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. यानंतर आझाद भाजप मध्ये जाणार की नवा पक्ष काढणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या. अखेर आझाद यांनीच याबाबत घोषणा केली आहे .
काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी मी जम्मू-काश्मीरला जाणार असल्याचं म्हटलं आहे. मी स्वतःचा पक्ष बनवणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये माझे अनेक मित्र आहेत. मी भाजपमध्ये जाणार असे विरोधक आधीच सांगत आहेत पण तसे काही नाही. मी भाजपमध्ये जाणार नाही, मी माझा नवा पक्ष काढणार आहे. अशी घोषणा गुलाम नबी आझाद यांनी केली. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
दरम्यान, आझाद यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेत्यांकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. सर्वात जुना व्यक्ती पक्ष सोडून गेला हे दुर्दैवी आहे. पक्षाने आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. तर बीके हरिप्रसाद म्हणाले की, गुलाम नबी आझाद यांनी या गंभीर वळणावर पक्ष सोडायला नको होता. राहुल गांधींना दोष देणे योग्य नाही. त्यांना सत्तेत राहायचे होते. नुकसान फक्त आझादांचे होईल, काँग्रेसचे नाही अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.