हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या माजी काँग्रेस नेते आणि राज्यसभेत खासदार राहिलेले गुलाम नबी आझाद यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी, “इस्लाम धर्माचा उगम १५०० वर्षांपूर्वी झाला आहे. पण हिंदू धर्म खूप प्राचीन आहे. भारताचे मुसलमान मूळ रूपाने हिंदू होते. नंतर ते धर्मांतरीत झाले आहेत” असे थेट वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. डोदा जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी काश्मिरी पंडित आणि मुस्लिम धर्माविषयी भाष्य केले.
यावेळी बोलताना, “सहाशे वर्षांपूर्वी काश्मिरमध्ये मुस्लिम नव्हते. त्यामुळे आता जे मुस्लिम येथे आहेत, ते काश्मिरी पंडितापासून परावर्तित झालेले आहेत. इस्लाम १५०० वर्षांपूर्वी धर्माच्या रुपात समोर आला. त्यामुळे जगभरातील सर्व मुस्लिम परिवर्तित झालेले आहेत.” असे गुलाम नबी आझाद यांनी म्हणले आहे. तसेच, “मुस्लिम बाहेरुन आले असणार आहेत. मुगल लष्करातील काही लोक मुस्लिम असतील. पण, इतर सर्व लोक हिंदू किंवा शीख धर्मातून मुस्लिम धर्म स्वीकारलेले असतील” असेही ते म्हणाले.
Listen to Congress senior leader Gulam Nabi Azad on Hinduism in India.
👇👇 pic.twitter.com/BNm80LK0FL— 𝐒𝐚𝐠𝐚𝐫 𝐆𝐨𝐮𝐝 (@Sagar4BJP) August 16, 2023
पुढे बोलताना, “धर्माची राजकारणात सळमिसळ करू नका. धर्माच्या नावावर मतदान करू नका. राजकारणात जो धर्माचा आधार घेतो तो कमकुवत असतो. ज्याची स्वतःवर श्रद्धा आहे, तो धर्माचा आधार घेणार नाही. मी पुढे काय करणार, विकास कसा आणणार हे योग्य व्यक्ती सांगेल. पण जो दुर्बल आहे तो स्वत:च्या धर्माचा आधार घेत मतं मागेल” असं आवाहन आझाद यांनी केले.
मुख्य म्हणजे यावरच न थांबता, “जगाच्या इतिहासात, इस्लाम फक्त पंधराशे वर्ष जुना आहे. हिंदू धर्म फार जुना आहे. १०-२० लोक मुघल सैन्यासोबत बाहेरुन आले असतील. बाकी सर्वांचे धर्म परिवर्तन झाले आहे. काश्मिर हे त्याचे एक उदाहरण आहे. ही भूमि आपलीच आहे. कोणीही इथले किंवा बाहेरून आलेले नाही. आम्ही सारे इथलेच आहोत” असे आझाद यांनी ठणकावले.