गिरीश बापट यांचे निधन; 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे पुणे लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री गिरीश बापट (Girish Bapat) यांचे दुःखद निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. तेथेच त्यांची प्राणजोत मालवली. आज सायंकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी होणार आहेत. बापट यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

पुण्याच्या राजकारणात गिरीश बापट हे सर्वात मोठं नाव होत. कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. 1983 मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. 1995 पासून कसबा पेठ मतदारसंघाचे ते आमदार राहिले होते. त्यांनतर 2019  मध्ये त्यांनी भाजपकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा 96 हजार मतांनी पराभव केला होता.

नुकत्याच पार पडलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. आजारी असतानाही ऑक्सिजन लावून आणि व्हिलचेअरवर बसून त्यांनी भाजपचा प्रचार केला होता. याशिवाय तब्ब्येत ठीक नसतानाही त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. दांडगा जनसंपर्क आणि सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध ही गिरीश बापट यांची जमेची बाजू मानली जाते. सर्वच पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वच लोकांची कामे केली आहेत. त्यामुळे गिरीश बापट यांच्या निधनाने पुणेकरांचे मोठं नुकसान झालं हे मात्र नक्की..