सोलापूर प्रतिनिधी | नऊ वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने राहत्या घरी गळफास घेतल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथे घडली आहे. लग्नास नकार देऊन शारीरिक व मानसिक त्रास दिल्याच्या कारणावरून तरूणीने आत्महत्या केल्याप्रकरणी मोहोळ येथील शिवसेनेच्या माजी तालुका प्रमुखाचा मुलगा व शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविकेवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवरत्न दीपक गायकवाड, सीमा सुभाष पाटील (दोघे रा. कुरूल, ता. मोहोळ, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार, शिवरत्न गायकवाड याचे गीतांजली विलास पाटील (वय २८, रा. कुरूल, ता. मोहोळ) हिच्यासोबत गेल्या नऊ महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. गीतांजली ही शिक्षणासाठी सोलापुरात आली होती. पत्रकार भवन येथील वॉटर फ्रंट डी विंग फ्लॅट नं.४०१ मध्ये राहत होती. शिवरत्न गायकवाड याने गीतांजली हिला गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला होता. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. हा प्रकार नऊ वर्षे चालला. त्यानंतर शिवरत्न गायकवाड व सीमा पाटील यांनी संगनमत करून गीतांजली हिला लग्नास नकार दिला. त्यानंतर तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून गीतांजली हिने वॉटर फ्रंट येथील राहत्या फ्लॅटमध्ये पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. तिला पोलीस नाईक वाडीकर यांनी शासकीय रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला मृत झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी विलास मारूती पाटील (वय ५७, रा. कुरूल, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिली होती चिठ्ठी
गीतांजली ही ‘लॉ’चे शिक्षण घेत होती. ती वॉटर फ्रंट डी विंग फ्लॅट नं. ४० मध्ये एकटी राहत होती. तिने आत्महत्या केल्याचे लक्षात आल्यानंतर सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर गीतांजली हिच्याकडे मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. चिठ्ठीत तिने शिवरत्न याच्याशी प्रेमसंबंध होते, तो आता लग्नाला नकार देत आहे. म्हणून मी माझे आयुष्य संपवत आहे असे लिहिले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.