सातारा | महाराष्ट्रात शहरी भागापेक्षा आता ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. ग्रामीण भागात गृह विलगीकरणात असलेले रुग्ण जागेअभावी त्यांच्याकडून नियम पाळले जात नाहीत. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी ग्रामीण भागात कोरोना केअर सेंटरची संख्या वाढवावी, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज सांगितले.
गोंदवले बु. येथील चैतन्य कोविड सेंटरचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ऑनलाईन विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण ) राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार जयकुमार गोरे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी, तहसिलदार बाई माने, अनिल देसाई यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटात वैद्यकीय सेवेचे विकेंद्रीकरण केले पाहिजे. यातुन आणखी आरोग्य सुविधा वाढविल्या पाहिजेत. यापुढे कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी शरथीचे प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी नागरिकांनी घाबरुन न जाता शासन, प्रशासनाला साथ द्या. तुमच्यासाठी माण येथील आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी गोंदवले महाराज ट्रस्टने मोठी जबाबदारी स्विकारली पाहिजे. याला शासन पूर्णपणे मदत करेल असे आश्वासनही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिले.
गोंदवले बु. येथे सुरु केलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये 30 ऑक्सिजन बेड आणि 100 साधे बेड असणार आहेत. त्याचबरोबर कोरोना केअर सेंटरसाठी मदत करणाऱ्या संस्थांचे विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी अभिनंदन केले.
अखेर महिन्यानंतर कोव्हिड सेंटर सुरू
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच या कोव्हिड सेंटरला विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सर्व व्यवस्था एक महिन्यापूर्वी केलेली असताना सुरू का होत नाही असा सवाल केला होता. या गोष्टीकडे अधिकारी व एका राजकीय पुढाऱ्यांमुळे विलंब होत असल्याचे बोलले जात होते. तेव्हा संजय भोसले यांनी माण तालुक्यातील लोकांसाठी सेंटर सुरू करावे अशी विनंती केली होती. तसेच कुणाला श्रेय घ्यायचे त्यांनी घ्यावे.