औरंगाबाद – शिवसेना व एमआयएम हे राजकीय पक्ष कट्टर विरोधक आहेत. पण, शुक्रवारी महापालिकेच्या नेहरू भवन पुनर्विकास कार्यक्रमात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांचे कौतुक केले तर इम्तियाज जलील यांनी ‘सत्तार यांचे आशीर्वाद मिळाले तर, 2024 मध्ये माझ्यासाठी अच्छे दिन असतील’ असे वक्तव्य केल्याने कार्यक्रमाला उपस्थित नागरिक अवाक् झाले. महापालिकेने बुढीलेन येथील नेहरू भवनची जुनी इमारत पाडून भव्य व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाचे शुक्रवारी खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. व्यासपीठावर राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी महापौर नंदकुमार घोडेले, एमआयएमचे माजी गटनेता नासेर सिद्दिकी, माजी नगरसेवक जमीर कादरी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
यावेळी सत्तार यांनी आपल्या शैलीत टोलेबाजी करत उपस्थितांमध्ये हशा पिकविला. ‘इम्तियाज जलील पढा लिखा अच्छा आदमी है. कहॉं किसका नाक दबाना, किसका मुँह खोलना, उनको अच्छी तरह मालूम है’!, लोकसभा निवडणुकीत ते लंगड्या घोडीवर बसून आले होते, तरीही ते जिंकले. त्यांच्याकडे विरोधी पक्षाचे लायसन्स आहे. माझ्याकडे सत्तेचे आहे, असे सत्तार म्हणाले. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शहरात केलेल्या विकासकामांचे त्यांनी कौतुक केले. एका हाताने ते आयुक्ताची तर दुसऱ्या हाताने प्रशासकाची सही करतात. त्यामुळे कामांची गती वाढली आहे.
इम्तियाज जलील म्हणाले, नेहरू भवनच्या नव्या इमारतीचे स्वप्न मी पाहिले होते. ते आता पूर्ण होत आहे. औरंगाबाद शहराच्या सौंदर्यात भर घालणारी ही इमारत असेल. कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. केंद्र शासनाकडून निधी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वंदे मातरम् सभागृह व हज हाऊसचे काम अंतिम टप्प्यात आहे. सत्तारांनी लक्ष घालून निधी उपलब्ध करून दिला तर लवकरच या दोन्ही सभागृहांचे लोकार्पण होईल. प्रशासक श्री. पांडेय यांनी स्मार्ट सिटीतून हाती घेतलेल्या कामांमुळे औरंगाबादसाठी अच्छे दिन आले आहेत. मौलाना आझाद संशोधन केंद्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राचे नूतनीकरण करण्याची मागणी त्यांनी केली. शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी प्रास्ताविक केले. 30 कोटी रुपये खर्च करून व्यापारी संकुल उभारले जाईल, असे त्यांनी नमूद केले. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मनोगत व्यक्त केले.