शिखंडीप्रमाणे युद्धात उतरण्यापेक्षा….; शिवसेनेचा भाजपवर टिकेचा बाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप कडून जाणूनबुजून केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सत्ताधाऱ्याकडून करण्यात येतो. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिखंडी सारखे युद्धात उतरण्यापेक्षा आमने सामने येऊन युद्ध करण्याची तयारी दाखवा असे आव्हान शिवसेनेनं दिले.

भारतीय जनता पक्षाने म्हणे भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारले आहे. रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे हे सगळ्यांना माहीत आहे, पण भाजपनेही युद्ध पुकारले आहे. तेही भ्रष्टाचाराविरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईस हे लोक युद्ध वगैरे म्हणत असतील तर ते मूर्खपणाचे लक्षण आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या ‘आड’ लपून हे लोक युद्धाचा आव आणीत आहेत. हो शिखंडी प्रयोग आहे. असे शिवसेनेनं म्हंटल.

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांचे पथक पोहोचले. त्यांना जो तपास करायचा तो करतील, पण भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्यांना एक आठवण करून द्यायची आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजप स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना महापालिकेतच लाखो रुपयांची लाच स्वीकारताना अटक झाली व आठवडाभर जेल भोगून ते पुन्हा स्थायी समितीचा पुढला भ्रष्टाचार करण्यासाठी रुजू झाले. यावर भाजपवाले तोंड का उचकटत नाहीत? असा सवाल शिवसेनेनं केला.

किरीट व नील सोमय्या या पिता-पुत्रांनी राकेश वाधवानच्या मदतीने केलेला घोटाळा भविष्यात त्यांना तुरुंगात ढकलत नेणार आहे. कर नाही तर डर कशाला हे भाजपवाल्यांचे म्हणणे मान्य केले तर नील किरीट सोमय्या हे सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी का गेले आहेत? महाविकास आघाडीचे ‘डर्टी पाच डझन’ नेते तुरुंगात जाणार अशी घोषणा चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या करतात. म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून आणि वापरूनच हे करणार ना? मग तुमचे ‘डर्टी डझन’ त्या वेळेला काय सिमल्याच्या बर्फात स्वर्गसुखाचा आनंद घेत बसणार आहेत का? किरीट सोमय्या, नील सोमय्या, प्रसाद लाड, पुण्याचे मोहोळ, गिरीश महाजन, मुनगंटीवारांचा ‘झाड’ घोटाळा, अमोल काळे, विजय ढवंगाळे यांचा महापोर्टल आयटी घोटाळा, अगदी चंद्रकांत पाटलांनी सार्वजनिक बांधकाम, महसूलमंत्री म्हणून केलेले उद्योग कोणत्या ‘डर्टी डझन’मध्ये बसतात ते लवकरच कळेल असा इशारा शिवसेनेनं दिला.

पोलीस भरती घोटाळाही रटरटून शिजलाच आहे. आता सुरुवात झालीच आहे तर तुमचेही ‘डर्टी बारा’चे बारा वाजल्याशिवाय राहणार नाहीत. दरेकरांनी तर मुंबै बँक लुटून फस्त केली. त्यामुळे तिथेही तेरावे उरकावेच लागेल! राज्य गमावले म्हणून शिखंडीप्रमाणे युद्धात उतरण्यापेक्षा आमने सामने येऊन युद्ध करण्याची हिंमत दाखवा. चंद्रकांत पाटील म्हणतात, भाजप आता पूर्वीची राहिलेली नसून शिवसेनेला पुरून उरेल. पाटील म्हणतात ते खरेच आहे. भाजप पूर्वी पाठीमागून वार करणारी होती व आता तिचे रूपांतर शिखंडीत झाले आहे. हा बदल तर दिसतोच आहे. पुरून उरण्याची भाषा कसली करता? भविष्यात तुम्हीच किती उरताय ते पहा. युद्धाला युद्ध म्हणायचे असेल तर समोर या आणि लढा असे आव्हान शिवसेनेनं भाजपला दिले.