हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यानंतर विरोधकांकडून अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली जात आहे. आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी याच मुद्द्यावरून अजित पवारांवर निशाणा साधला. पुण्यात गर्दी जमवल्याप्रकरणी अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा इतरांवर दाखल गुन्हे त्वरित रद्द करा अशी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
पक्षाच्या कार्यक्रमाला गर्दी करता मग वारीवर निर्बंध कशाला असा सवालही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच अजित पवारांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असे म्हणत अजित पवार यांची अवस्था लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशी झाली आहे. अशा शब्दांत पडळकरांनी अजित पवारांवर निशाणा साधला.
११ मार्चला या राज्यातला एमपीएससी विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला की त्यांच्या परीक्षा ५ वेळा पुढे ढकलल्या आहेत. ६ व्या वेळी सरकारने सांगितले की परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या तेव्हा विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलन केलं त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे संयोजकावर गुन्हा दाखल का करण्यात आला? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.