हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज स्वप्नीलच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली. सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्वप्नीलचा मृत्यू झाला अशा शब्दांत त्यांनी सरकार वर निशाणा साधला.
एमपीएससीबाबत राज्य सरकारचे धोरण सुस्पष्ट नाही. आता बैठका घेत आहात, म्हणजे तुमचं अजून धोरणच ठरलेलं नाही. मग आतापर्यंत तुम्ही काय झोपा काढत होता का? असा संतप्त सवाल गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला यावेळी केला .तुम्ही दोन-तीन वर्षे पूर्व परीक्षाच घेणार नसाल आणि घेतली तरी तुम्ही ती सहा-सहा वेळा पुढे ढकलणार असाल, तर महाराष्ट्रातील या मुलांनी करायचं काय? असाही प्रश्न त्यांनी विचारला.
स्वप्निलाच मृत्यू होऊन आज किती दिवस झाले? त्या दिवशी तुम्ही केवळ असं व्हायला नाही पाहिजे…तसं व्हायला नाही पाहिजे.. असं बोलून दाखवलं. पण आज स्वप्निलच्या आई-वडिलांसोबत कोण आहे इथं? आज स्वप्निलच्या आई-वडिलांसमोर एवढे प्रश्न आहेत, घरासाठी कर्ज काढलय, पूजाचं लग्न करायचं आहे, तिचा नोकरीचा प्रश्न आहे. कोण याची जबाबदारी घेणार?” असा सवालही त्यांनी यावेळी केला.