हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एस टी कामगारांच्या चिघळलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात तब्बल 4 तास चर्चा होऊनही अद्याप ठोस मार्ग निघाला नाही. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांशी बोलावं, आझाद मैदानावर काय अतिरेकी बसले आहेत का असा सवाल पडळकरांनी केला.
मंत्री अनिल परब रोज एकच बोलत आहेत. त्यांच्या वक्तव्यात काहीच फरक नाही. ते वेगळं काहीच सांगत नाहीत. त्यांनी स्पष्ट भूमिका मांडावी. हे कर्मचारी त्यांचेच आहेत ना. त्यांनी इथं यावं आणि या कर्मचाऱ्यांशी बोलावं. हे काय कुठले अतिरेकी इथं येऊन बसले आहेत का? त्यांचेच कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांनी सरकारच्या वतीने अधिकृतपणे यावं. कर्मचारी त्यांच्याशी बोलायला तयार आहे असे पडळकर यांनी म्हंटल.
पवार- परब दरम्यान तब्बल 4 तास चर्चा
दरम्यान, एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात वरळी येथील नेहरू सेंटर येथे तब्बल 4 तास मॅरेथॉन बैठक सुरू होती. अत्यंत गुप्त अशा या बैठकीत एस टी कामगारांच्या मागण्या, आणि संप यावर खलबते झाली.दरम्यान, खुद्द शरद पवारांनी यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतल्याने एस टी कामगारांचा प्रश्न सुटणार असण्याची शक्यता आहे.