पवारांचे कितीही दौरे झाले तरी फरक पडणार नाही; पडळकरांचा निशाणा

padalkar pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेले कि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येतेच असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. पवारांनी कितीही दौरे केले तरी आता काहीही फरक पडणार नाही असं त्यांनी म्हंटल. बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पडळकर बोलत होते.

गोपीचंद पडळकर म्हणाले, शरद पवार यांचे कितीही दौरे झाले, तरीदेखीलआता काही फरक पडणार नाही. राष्ट्रवादी पक्ष नको असे म्हणणाऱ्या युवकांची फळी राज्यात निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारीपणाला यांच्या जातीवादीपणाला आणि यांच्या विश्वासघातीपणाला राज्यातील लोकांनी कायम नकार दिला आहे आणि इथून पुढेही देतील, अशा शब्दात पडळकरानी पवारांवर निशाणा साधला.

राज्यात गेल्या 40-50 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसला स्वबळावर तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाही. विश्वासघात न करता, कुणाच्या पाठीत खंजीर न खूपसता त्यांना कधी मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. राष्ट्रवादीमागून देशात अनेक लोकं आली. ममता बॅनर्जी स्वतःच्या भरोशावर मुख्यमंत्री झाल्या. मायावतीही मुख्यमंत्री झाल्यात. जगनमोहनसारखा नवीन चेहरा समोर आला. अरविंद केजरीवाल यांनी एकहाती सत्ता आणली असेही त्यांनी सांगितलं.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

शरद पवार यांचा एक महाराष्ट्र दौरा आणि त्यानंतर राष्ट्रवादी सत्तेत येतेच असं विधान सुप्रिया सुळे यांनी इंदापूर येथील एका आयोजित कार्यक्रमात केलं. . मी शरद पवार यांना नेहमी सांगते की, महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिले. पण विरोधी बाकांवर असताना जनतेने तुम्हाला जास्त प्रेम दिले. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. विरोधात आल्यानंतर शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर निघतात. त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते ते माहिती नाही. पण तो दौरा झाला की शरद पवार पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.