सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगली लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली. उमेदवारीची घोषणा जयसिंगतात्या शेंडगे व प्रकाश शेंडगे यांनी केली. ते आज शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. तर खासदार संजयकाका पाटील हे तालुक्यापुरते मर्यादीत नेते आहेत. पाच वर्षाच्या काळात प्रशासकीय बदल्या करून अधिकाऱ्यांना त्रास देणे हा एककलमी कार्यक्रम खासदारांनी केला असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.
वंचित बहुजन आघाडीकडून प्रथम जयसिंगतात्या शेंडगे यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर प्रकाश शेंडगे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र सोमवारी नागपूर येथे गोपीचंद पडळकर यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर पडळकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोतर्ब करण्यात आले. त्याची घोषणा जयसिंगतात्या शेंडगे व प्रकाश शेंडगे यांनी सांगलीत केली.
उमेदवारीची घोषणा होताच पत्रकारांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, मला उमेदवारी मिळू नये, म्हणून एक मोठा नेता कार्यरत होता. त्याने स्वाभिमानीच्या उमेदवारीत खोडा घातला. वंचित आघाडीच्या उमेदवारीची चर्चा सुरू असताना प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरु झाल्यानंतर आपले आरएसएस, शिवप्रतिष्ठानच्या नेत्यांबरोबर असलेले फोटो व्हायरल केले. मात्र हे भाजपमध्ये असताना होते असे गोपीचंद पडळकर म्हणले आहेत. खासदार म्हणून संजय पाटील यांनी जे काम करायला पाहिजे होते, ते बाजूला ठेवून या जिल्ह्यात आलेल्या अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन आपले ऐकणाऱ्या अधिकाऱ्यांची पाठराखण करुन जिल्ह्याच्या प्रगतीत खोडा घालण्याचेच काम केले आहे. त्यांनी आ.शिवाजीराव नाईक, आ.सुरेश खाडे यांच्या मंत्रीपदात आडकाठी देखील घातली आहे असे गंभीर आरोप गोपीचंद यांनी संजय पाटील यांच्यावर केले आहेत.