हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या दहा-बारा दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन उपोषण करणाऱ्या कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुढे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक बंद लिफाफा देऊन अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठवले होते. त्यामुळे आता मनोज पाटील हे आपले आंदोलन मागे घेतील अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु आम्ही सांगितल्याप्रमाणे सरकारने जीआर आणला तरच उपोषण मागे घेतले जाईल अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अर्जुन खोतकर यांच्यासमोर मांडली आहे.
शुक्रवारी शिष्टमंडळाची ताबडतोब बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक बंद लिफाफा अर्जुन खोतकर यांच्याकडे सोपवला होता. हा लिफाफा घेऊन अर्जुन खोतकर अंतरवली सराटी गावात देखील दाखल झाले. यानंतर मनोज पाटील यांनी एकनाथ शिंदे यांनी पाठवलेला लिफाफा उघडून पाहिला. परंतु त्या लिफाफ्यामध्ये मनोज पाटील यांनी सांगितलेल्या दुरुस्त्या केलेल्या नव्हत्या. त्यामुळे आपण उपोषणावर ठाम राहो अशी भूमिका मनोज पाटील यांनी मांडली. पुन्हा एकदा मनोज पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सरकारचे सर्व प्रयत्न फेल ठरले आहेत. त्यामुळे आता मनोज पाटील यांचे उपोषण मागे घेण्यासाठी सरकार त्यांच्या सर्व मागण्या मान्य करेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
आपली थांब भूमिका मांडत मनोज पाटील म्हणाले की, “२००४ च्या जीआरचा आम्हाला काहीही फायदा झाला नाही. ७ सप्टेंबरच्या शासन आदेशात सुधारणा झाली नाही. फेऱ्या होऊ द्या, मीही इथे झोपलेलोच आहे. सरकारने अर्जून खोतकर यांच्याकडे बंद लिफाफ्यात शासन आदेश पाठवला. मात्र, त्यात सरसकट मराठ्यांना आरक्षणाची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे माझं आमरण उपोषण सुरू राहील.”
त्याचबरोबर,”राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या जीआर वर आम्ही दुरुस्ती सूचवली होती. पण त्यात दुरुस्ती झाली नाही. 2004 च्या जीआरचा आम्हाला काहीच फायदा झाला नाही. मुख्य म्हणजे, “आमच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा. ज्यांच्याकडून फायरिंग झाले ते मुंबईला शिष्टमंडळासोबत फिरतात. आतापर्यंत एकावरही कारवाई झालेली नाही. सक्तीच्या रजेवर पाठवणं ही योग्य कारवाई नाही. तुम्ही कारवाई करा, नका करु, आमची ती मागणी नाही. पण आमच्यावरील गुन्हे मागे घ्या” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.