Tuesday, January 31, 2023

श्रमिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारने विशेष उपक्रम राबवावा : खा. श्रीनिवास पाटील

- Advertisement -

कराड प्रतिनिधी|सकलेन मुलाणी
स्थलांतरित होत असलेल्या श्रमिकांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, कामाच्या ठिकाणी त्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी. यासाठी भारत सरकारने विशेष उपक्रम राबवावा अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी सोमवारी लोकसभेत केली. लोकसभेत नियम 163 अंतर्गत शेतमजूरांचे जीवन आणि कल्याण सुधारणे या प्रश्नावर चर्चा करताना खा. श्रीनिवास पाटील यांनी ही मागणी केली.

यावेळी खा.पाटील म्हणाले, महाराष्ट्रात साखर संचालक म्हणून मी काम केले आहे. राज्यात साखर कारखान्यांची संख्या मोठी असून तेथे ऊसतोड मजूर राज्याच्या विविध भागातून येत असतात. कामानिमित्त त्यांना वेगवेगळया ठिकाणी अनेक दिवस वास्तव्य करावे लागते. काम संपल्यानंतर ते आपल्या गावी निघून जातात. मात्र त्यादरम्यान त्यांच्या बरोबर येणा-या त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना नसतात. त्यामुळे सदर मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते.

- Advertisement -

अशाच प्रकारे अन्य क्षेत्रात काम करणा-या अस्थायी स्थलांतरित मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा देखील प्रश्न निर्माण होत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद अथवा अन्य मार्गातून त्याठिकाणी शिक्षणा संदर्भातील विशेष उपक्रम संपूर्ण भारतभर राबवला जावा अशी मागणी त्यांनी केली. याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन ही मुले शाळाबाह्य राहणार नाहीत यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असे खा. पाटील म्हणाले.