हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राचे राज्यपाल सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता तर त्यांनी थेट मुंबईबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे .
मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात राज्यपाल म्हणाले, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असेही भगसिंह कोश्यारींनी म्हंटल.
राज्यपालांच्या या विधानानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील नेते आक्रमक होऊ शकतात. तसेच भाजप नेते यावर काय प्रतिक्रिया देणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव आहे असा आरोप सातत्याने महाविकास आघाडीकडून केला जात होता त्यातच आता राज्यपालांनी हे वक्तव्य केल्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. भाजप नेते यावर काय प्रतिक्रिया देतात हे आता पाहावं लागेल.