हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला. फडणवीसांच्या आरोपाला ठाकूर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी आणि 13 तारखेला घडलेली घटना या दोन्ही घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस तपास करत आहेत. असे असताना फडणवीस अर्धवट माहिती घेऊन बोलत आहेत. त्यांनी केलेले विधान हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे, ठाकूर यांनी म्हंटले.
अमरावती या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावती येथे जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पालकमंत्री यशोमती ठाकूर याच्यावर आरोप केले. त्यांच्या आरोपांना ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “फडणवीस जबाबदार नेते आणि विरोधी पक्षनेते आहेत असे वाटले होते. परंतु त्यांनी आज बेजाबाबदारपणे विधाने केली आहेत. फडणवीस भडकवत असल्यासारखे वाटत आहेत. अर्धवट माहिती घेऊन ते बोलत आहेत. त्यांनी पूर्ण अभ्यास करावा.
अमरावती या ठिकाणी घडलेल्या दोन्ही घटनांच्याबाबत महाविकास आघाडी सरकार निष्पक्षपाती भूमिका घेत आहे. ज्यांनी कोणी दंगल भडकवली असेल त्याला सोडले जाणार नाही. आता अमरावती शांत झाले आहे. कोणीही बाहेरून येऊन आमच्या अमरावतीला भडकावू नका, असा इशारा शेवटी ठाकूर यांनी फडणवीसांना दिला आहे.