जळगाव | जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर आणि उपाध्यक्ष पदी शिवसेनेचे श्याम सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ जागांपैकी २० जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली होती. मात्र, अध्यक्ष व उपाध्यक्ष पद नेमकं कोणाला मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी अजिंठा विश्रामगृहात महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी फॉर्म्युला ठरविण्यात आला.
तब्बल एक ते दीड महिन्यांपासून जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. आज सकाळी बँकेवरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांची बैठक झाली. त्यात अध्यक्षपदासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव निश्चित करण्यात आले. शिवसेनेकडून उपाध्यक्षपदासाठी श्यामकांत सोनवणे यांचे नाव निश्चित करण्यात आले.