राज्याचं अन्न व औषध प्रशासन झोपी गेलंय का? : महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आज रात्रीपासून 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केलीय. दरम्यान, राज्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस विदारक बनत चालली आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक बनत चाललं आहे. अशावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय. राज्य सरकार पुण्याकडे दुर्लक्ष करत आहे. राज्याचं अन्न व औषध प्रशासन झोपी गेलंय का? असा सवाल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विचारलाय.

पुणे शहरात सध्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि व्हेंटिलेटर्सचा मोठा तुटवडा भासत आहे. आम्ही रोज मागणी करतोय. पण त्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मोहोळ यांनी केलाय. पुणे शहराला रेमडेसिव्हीर मोठ्या प्रमाणात लागत आहे. हे माहिती असतानाही त्याला पुरवठा केला जात नाही. रेमडेसिव्हीर आणि व्हेंटिलेटर संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिल्याची माहितीही मोहोळ यांनी दिली आहे.

ठाकरे सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात आता पुण्यातील व्यापाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. या व्यापाऱ्यांनी आता राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरु केली आहे. येत्या दोन दिवसांत पुणे व्यापारी महासंघ उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे समजते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर नवा पेच उभा राहण्याची शक्यता आहे.