हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ६४ वा वाढदिवस आहे. अजित दादांनी यावर्षी आपला वाढदिवस साजरी न करण्याचे सांगत इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. मात्र तरी देखील वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवारांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे, या होल्डिंगवर अजित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर ट्विट करत लवकरच अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असे म्हंटल, त्यामुळे चर्चाना उधाण आलं. खरच अजितदादा मुख्यमंत्री होतील का? असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना पडत आहे. याचबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारलं असता त्यांनी सूचक विधान केलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ याना अजित पवार यांच्या “भावी मुख्यमंत्री” उल्लेखाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना, “भावी म्हणजे त्याला किती काळ आहे? दोनजण ( एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ) मुख्यमंत्री होऊन गेले आहेत. एक अद्याप व्हायचे आहेत. आता नियतीच्या मनात काय आहे हे माहिती नाही. परंतु लोकांच्या तशा अपेक्षा आहेत” असे मुश्रीफ यांनी म्हणले आहे.
मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व pic.twitter.com/12jZ8BMPRi
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 21, 2023
अमोल मिटकरी यांचे ट्विट नेमकं काय ?
अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटमुळे शिंदे गटाच्या आमदारांची झोप उडू शकते. मिटकरी यांनी आपल्या ट्विट सोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. अवघ्या 31 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये अजित पवारांचे भाषण, त्यांचे डायलॉग दाखवण्यात आले आहेत. निडर नेतृत्व, करारी व्यक्तिमत्त्व…. संघर्षयोद्धा अजितदादा असं या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. तसेच मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व असं कॅप्शन मिटकरी यांनी दिले आहे.