हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा तोल घसरला आहे. चंद्रकांतदादांवर सडकून टीका करताना चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती कुठून आली?, असं धक्कादायक विधान हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. टीका करण्याच्या नादात मुश्रीफ यांची जीभ घसरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून त्यावर तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजपच्या आयटीसेलच्या प्रमुखाने आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यावरून हसन मुश्रीफ यांनी माफी मागा नाही तर परिणामांना सामोरे जा, असा इशारा दिला होता. त्यावर मीडियाशी संवाद साधताना मुश्रीफ यांनी हे विधान केलं. मी फक्त मीडियासेल प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. याप्रकरणी भाजपने माफी मागावी अशी मागणी केली होती. पण चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती आली कुठून? त्यांची लायकी नाही, ते भित्रे आहेत. त्यांना कोल्हापुरातून पळून जावं लागलं आहे, अशी घणाघाती टीकाही मुश्रीफ यांनी केली.
कोल्हापुरातून पळून गेलेल्या व्यक्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रामाणिक आणि सोज्वळ व्यक्तीवर बोलणं योग्य नाही. कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, राजकारण किती करायचं याला काही मर्यादा आहेत की नाही? असा संतप्त सवाल करतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असो की चंद्रकांत पाटील, भाजपचे सर्व नेते सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. त्यांना सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करू देत की काहीही आरोप करू देत, हे आघाडी सरकार पाच नाही तर 25 वर्षे चालणार आहे, असंही ते म्हणाले.
भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी सोमवारी यासंदर्भात ट्विट केले होते. ‘सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला असं काय सांगितलं की, शरद पवार यांच्या पोटात इतक्या जोरात दुखायला लागलं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. आता तर वाटतं की, ‘दाल में कुछ काला नही, पुरी दालही काली है’ असे नवीन कुमार जिंदल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. शरद पवार यांची ही पोटदुखी पाहता, पश्चिम बंगालच्या आधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल, असे वाटत असल्याची खोचक टिप्पणीही नवीन जिंदल यांनी केली होती.