जयपूर । आपल्याला राजस्थानचे उपमुख्यमंत्रिपद नकोच होते असा गौप्यस्फोट राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून हटवले गेलेले काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी आपल्याला गळ घातल्यामुळेच आपण या पदासाठी तयार झालो, मात्र आपली ते पद स्वीकारण्याची इच्छाच नव्हती, असे पायलट म्हणाले.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत प्रथमच आपल्या नाराजीवर पायलट यांनी जाहीर भाष्य केलं आहे. “आपण पक्षासाठी इतकं काम केलेलं असतानाही फक्त अनुभवाच्या आधारे अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला. नाराज असतानाही राहुल गांधी यांनी आग्रह केल्यानेच आपण उपमुख्यमंत्रीपद घेतलं,” असा खुलासा सचिन पायलट यांनी यावेळी केला आहे. मुख्यमंत्री गहलोत यांनी सत्तेचे आणि कामाचे समसमान वाटप करावे असे निर्देश राहुल गांधी यांनी गहलोत यांना दिले होते. मात्र तसे करण्याऐवजी मुख्यमंत्री गहलोत यांनी आपल्याला बाजूला सारले, अपमानीत केले, असा थेट आरोप सचिन पायलट यांनी अशोक गहलोत यांनी केला.
मुख्यमंत्री होणं इतकं महत्त्वाचं का आहे?
यावेळी तुमच्यासाठी मुख्यमंत्री होणं इतकं महत्त्वाचं का आहे? असं विचारण्यात आलं असता सचिन पायलट यांनी म्हटलं की, “हे मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी नाही आहे. २०१८ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर मी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता हे खरं आहे. पक्षाच्या फक्त २१ जागा असताना मी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतली होती. मी लोकांसोबत काम करत असताना पाच वर्षात अशोक गेहलोत यांनी तोंडातून एक शब्दही काढला नाही. पण पक्षाचा विजय होताच अशोक गेहलोत यांनी अनुभवाच्या आधारे मुख्यमंत्रीपदावर दावा केला. पण त्यांचा अनुभव काय आहे ? १९९९ आणि २००९ असं दोन वेळा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं. २००३ आणि २०१३ च्या निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या जागा ५६ आणि २६ वर आणल्या होत्या. तरीही त्यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री करण्यात आलं”.
राहुल गांधी यांनी मध्यस्थी केली का?
राहुल गांधी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला का असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “राहुल गांधी आता काँग्रेस अध्यक्षपदी नाहीत. गतवर्षी त्यांनी पद सोडल्यानंतर अशोक गेहलोत आणि त्यांचे सहकारी माझ्याविरोधात एकत्र आले. तेव्हापासून माझा स्वाभिमान वाचवण्यासाठी लढा सुरु आहे”. “सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्यासोबत माझा काही संपर्क झालेला नाही. प्रियंका गांधी यांच्यासोबत माझं बोलणं झालं. पण ते वैयक्तिक संभाषण होतं,” अशी माहिती सचिन पायलट यांनी दिली आहे.
तुमच्या मागण्या काय?
सचिन पायलट यांना त्यांच्या मागण्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “मला मुख्यमंत्री आणि माझ्या सहकाऱ्यांना मंत्रीपद द्यावं अशी माझी मागणी नाही. सन्मानपूर्वक कामाचं वातावरण असावं जेणेकरुन कामाचं समान वाटप होईल अशी माझी मागणी आहे. हा सत्ता, पद किंवा सुविधेचा प्रश्न नाही तर सन्मान आणि काम करण्याचं स्वातंत्र्य मिळण्याबद्दल आहे”.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.