सांगली | मिरजेतील मंगळवार पेठेतील शनि-मारूती मंदिरात मद्यधुंद अवस्थेत एक इसम मंदिरात जावून मंदिराची काच फोडून देवाजवळ असलेली पितळी पंचपाळ चोरून नेण्याचा प्रयत्न करीत असताना नागरीकांनी त्याला पकडून चोप दिला. त्याच्याकडे इतर ठिकाणी चोरून आणलेले मंदिराचे पितळी कळस होते. मिरज शहर पोलिसांनी या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चोरट्यास ताब्यात घेतले आहे. तो इसम वेगवेगळी माहिती देत असल्याने दारूची नशा उतरल्यानंतर सर्व माहिती घेतली जाणार आहे.
मंगळवार पेठेतील शनि-मारूती मंदिराजवळ असलेल्या हारगे यांच्या भांड्याच्या दुकानात अंदाजे 65 वर्षे वयाचा एक इसम मद्यधुंद अवस्थेत पांढर्या पोत्यामध्ये चारफुटाचा पितळी कळस घेवून आला. तुम्ही कळस विकत घेता का अशी विचारणा केली. हारगे यांना संशय आल्याने त्यांनी तो कळस आम्ही घेत नाही असे सांगितले. तेथून तो पोते घेवून बाहेर पडला.
त्यानंतर शेजारीच असलेल्या शनि-मंदिरात हा मद्यधुंद अवस्थेत इसम गेला. देवाजवळच असलेली पितळी पंचपाळ घेण्यासाठी हात घातला. परंतु काचेचा दरवाजा असल्याने तो दरवाजा जोरात ओढला. त्यामध्ये दरवाजाची काच फुटली आणि जोरात आवाज आला. मंदिरात कशाचा आवाज आला म्हणून पाहण्यास गेले असता तो इसम तेथून पळ काढला. त्या इसमास येथील नागरीकांनी पकडून आले.
त्यांच्या पोत्यात काय याची पाहणी केली असता पोत्यामध्ये पितळी कळस होता. त्याला नागरीकांनी चोप दिला व त्याला कळस कोठून आणला याची विचारणा केली असता तो कळस कारंदवाडी येथून आणल्याचे सांगितले. त्याने आपले नाव प्रकाश आण्णा पाटील असून मी करंदवाडीचा असल्याचे सांगितले. मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे पोलिस त्याला ताब्यात घेतले.