कराड | तांबवे हे गाव मोठे असून अजूबाजूला अनेक छोटी- मोठी गावे आहेत. तेव्हा गावात पहिल्यांदा प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे. लोकांच्या आरोग्यासाठी आरोग्य केंद्र अत्यंत आवश्यक असून त्यासाठी जागा बघून प्रस्ताव द्या, अशीही सूचना माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
पूरग्रस्त तांबवे गावास आमदार चव्हाण यांनी भेट देऊन पूरपरिस्थिती नंतरच्या अवस्थेची पाहणी केली. तत्पूर्वी त्यांनी सह्याद्री साखर कारखान्यांचे माजी संचालक ज्येष्ठ नेते (कै.) पी. डी. पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य (कै.) डॉ. डी. के. पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी तांबवे ग्रामपंचायतीस भेट दिली. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, तांबवे गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, सह्याद्री कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील, युवा नेते सतीश पाटील, उद्योजक अशोकराव पाटील, तांबवे ग्राम सोसायटीचे सचिव सुनील पाटील, काकासाहेब पाटील, उपसरपंच अॅड. विजयसिंह पाटील, आबासाहेब पाटील, प्रकाश पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार चव्हाण यांनी तांबवे पुलाची पुरामुळे झालेली दुरवस्थेची पाहणी केली.
ग्रामपंचायतीतील भेटीदरम्यान आमदार चव्हाण यांनी गावासाठी पहिल्यांदा प्राथमिक आरोग्य केंद्र घ्या. गाव मोठे असल्याने परिसराला त्याचा फायदा होईल, असे सांगितले. त्यावर गावाला जागा नसल्याने अडचण असल्याचे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांनी सांगितले. त्यावर आमदार चव्हाण यांनी जागेसाठी प्रस्ताव द्या, अशा सूचना केल्या.