व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रात पुढील 2 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रदीर्घ विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसात आहे. त्यानंतर आता हवामान खात्याने देखील पुढील दोन चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, तसेच पालघरमध्ये येत्या दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदूर्गमध्ये ‘येलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा

मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. महत्वाचे म्हणजे राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. सध्या राज्यातील अनेक भागात पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. योग्य प्रमाणात पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा उपसा करणे कठीण जात आहे. मात्र आता मुसळधार पावसामुळे शेतीला पाणी मिळेल, पीके बहरतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पावसाने जोर धरला आहे. तेथील नद्या ओढे गच्च भरून वाहत आहेत. तर
गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. गोदावरी नदीच्या जवळील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये वीज खंडित करण्यात आली आहे. लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांच्या संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.

मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

मराठवाडा, विदर्भात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. गोकुळाष्टमीपासून मुंबई पालघर ठाण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर आता विदर्भात आणि मराठवाड्यात देखील पुढील दोन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.