सातारा – सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग हा पावसाचे आगार समजला जातो. अर्धा अधिक जून महिना कोरडा गेल्यानंतर उशीरा का होईना पण आता पश्चिम भागात दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. महाबळेश्वरमध्ये गेल्या चोवीस तासात 118 मि. मी. पावसाची नोंद झाली असून धरणात पाण्याची आवक देखील सुरू झाली आहे.
पश्चिमेकडील पावसाने धरणात आवक सुरू
सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील कास, बामणोली, महाबळेश्वर, पाचगणी परिसरात दमदार पाऊस कोसळू लागला आहे. महाबळेश्वरमध्ये आता पावसाचा जोर वाढत आहे. या पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे. पुर्वेकडे पावसाची अद्याप प्रतिक्षाच आहे. अशा स्थितीत कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस संजीवनी ठरत आहे.
पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू
पावसाअभावी कोयना धरणातील पाण्याने तळ गाठला होता. मागील आठ दिवसांपुर्वी धरणात केवळ 5 टीएमसी एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. तथापि, धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरूवात होऊन धरणात पाण्याची आवक होऊ लागल्याने धरण व्यवस्थापनाने सुटकेचा निश्वा:स टाकला आहे. पुर्वेकडील परिस्थिती लक्षात घेऊन धरणाचा पायथा वीजगृह कार्यान्वित करून कोयना नदीपात्रात 2100 क्युसेक इतरा विसर्ग सुरू करण्यात आला.
कोयना धरणात 11 टीएमसी पाणीसाठा
सध्या कोयना धरणात 11.18 टीएमसी (10.60 टक्के) इतका पाणीसाठा आहे. यापैकी 5 टीएमसी हा मृत साठा आहे. धरणातील पाणीपातळी 618.896 मीटर आहे. पायथा वीजगृहातील दोन जनित्रांद्वारे वीजनिर्मिती करून 2100 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतील कोयना नदीकाठच्या गावांची चिंता दूर झाली आहे. गेल्या चोवीस तासात धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 49 मिलीमीटर, नवजा येथे 74 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
ओझर्डे धबधबा कोसळू लागला
कोयना परिसरातील ओझर्डे धबधबा हा पर्यटकांचे आकर्षण ठरतो. पावसामुळे हा धबधबा फेसाळत कोसळू लागला आहे. हे विहंगम दृश्य कोयना परिसराच्या सौंदर्यात भर घालत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची पावले नवजाकडे वळू लागली आहेत.