मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे बंद पडलेले चित्रीकरण आता सुरु झाले आहे. मात्र सिनेमा, मालिका यांच्यामध्ये काम करणाऱ्या अनेक कलाकारांचे मानधन वेळेवर दिले जात नाही. यावर भडकलेल्या हेमांगीने फेसबुकवर पोस्ट करत आपला राग व्यक्त केला आहे. आणि आता तरी ३० दिवसांचे क्रेडिट ठेवा असे ती म्हणाली आहे. ‘बऱ्याच मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झालीये…छान मस्त! पण ते ९० दिवस क्रेडिटचं भूत अजून ही मानगुटीवर आहे… आधीच १०० दिवस काम नाही त्याचे पैसे नाही आणि आता काम सुरू होऊन त्यात ही १०० दिवसांची भर!’ असे तिने लिहिले आहे.
३६५ पैकी २०० दिवस पैसे अकॉउंटला जमा होणार नाहीत. कर्ज घेतलेल्या बँकेत कसं पाऊल ठेवावं कळत नाहीये! इन्शुरन्स पॉलिसीच्या प्रीमियम कसे भरायचे? घरात दोघे ही याच क्षेत्रात काम करत असतील त्यांचं काय? असे प्रश्न तिने मांडले आहेत. त्याबरोबरच खरी स्थिती सांगताना तिने ‘उरलेल्या १६५ दिवसांमध्ये या पैशांसाठी सतत फोन करायचे, मेसेज करायचे… आज …उद्या… या आठवड्यात करत करत अजून किती दिवस जाणार माहीत नाही!’ लिहिले आहे.
https://www.facebook.com/hemangii.kavidhumal/posts/3597450890274514
‘कलाकार आणि तंत्रज्ञ टीमकडून पूर्ण सहकार्याची अपेक्षा! पण च्या मानधनाच्या बाबतीत आम्ही अजिबात अपेक्षा करायची नाही! आता तर ‘new normal’ सुरू झालंय! कलाकाराने स्वतः मेकअप, हेअर, कॉस्च्युम करायचे, स्वतःच स्पॉट दादा व्हायचं! आणि मुख्य म्हणजे वेळेत ७ च्या शिफ्टला, महिला कलाकारांनी तर ४.३० वाजता उठून ६.३० च्या कॉल टाईमला हजर रहायचं… पण मिळणाऱ्या मानधनाचे टाईमिंग? ते आधी ही गंडलेलं होतं आता ही तसच गंडणार आहे! हे कोण बघणार?’ असे म्हणत निदान काही महिने तरी ३० दिवसाचं क्रेडिट ठेवावं! अशी मागणी केली आहे.




