पुणे प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी २ महिन्यापासून संचारबंदी सुरु आहे. विषाणूचा वाढत संसर्ग पाहता यंदा शैक्षणिक वर्षाची सुरुवात १ ऑगस्ट पासून करण्याचे नियोजन होते. मात्र डेक्कन एज्युकेशन सोसायटीने त्यांच्या संस्थेची सर्व महाविद्यालये १ जून पासून सुरु करण्याचे ठरविले आहे. महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरु करणार असून नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाची सुरुवात बुधवारपासून झाली असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे यांनी दिली आहे. ही माहिती देण्यासाठी संस्थेने ऑनलाईन पत्रकार परिषद आयोजित केली होती.
कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होते आहे. स्थिती कधी आटोक्यात येईल हे सांगता येत नाही म्हणूनच संस्थेचे प्रायमरी पासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरु होते. पण सध्याची स्थिती पाहता महाविद्यालयीन वर्ग ऑनलाईन पद्धतीने नियमित सुरु केले जातील. यामध्ये संस्थेच्या पुण्यासहीत मुंबई आणि सांगली येथील कला,वाणिज्य, विज्ञान, विधी, व्यवस्थापन, नर्सिंग अशा सर्व शाखांचा आणि महाविद्यालयांचा समावेश असेल याची माहिती कुंटे यांनी दिली.
आतापर्यंत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तात्पुरते ऑनलाईन वर्ग घेतले गेले आहेत. पण लवकर महाविद्यालये सुरु होण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे आता हे वर्ग नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दोन महिने अधिक फायदा होणार आहे. सर्व विषयांचे वर्ग घेतले जाणार असून एका विषयाची लेक्चर १ तास असेल अशी माहिती ऍड. नितीन आपटे यांनी दिली. यासाठी मायक्रोसॉफ्ट चे लायसन्स घेतले असून शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये म्हणून सर्व प्रकारच्या ऑनलाईन साधनांचा वापर करण्यात येणार आहे. या परिषदेत विद्यार्थ्यांनी आणखी कोणत्या उपक्रमात सहभाग घेतला याचीही माहिती देण्यात आली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.