धक्कादायक ! आई घरी नसल्याचे पाहून घरमालकाचे 13 वर्षीय मुलीशी गैरवर्तन

औरंगाबाद – राज्यात तसेच औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. अशातच अल्पवयीन मुलीची आई संध्याकाळी कामानिमित्त बाहेर गेलेली पाहून घरमालकाने मुलीशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत घडला. मात्र घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारील लोक तिच्याकडे धावले. त्यानंतर ही सर्व घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी घरमालकाला बेड्या ठोकल्या. भरत गिरीश मेहता (30), असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मेहताचे श्रीकृष्ण नगरात स्वतःचे घर आहे. त्याच्या घरात विविध 8 भाडेकरू राहतात. यापैकीच एक पीडितेचे घर. पीडिता ही तिच्या आईसह किरायाने राहते. 17 जानेवारी रोजी रात्री तिची आई घराबाहेर गेली होती. ही संधी पाहून मेहता मुलीच्या खोलीत गेला आणि त्याने तिच्याशी गैरवर्तन केले. घाबरलेली पीडिता मोठ्याने ओरडली. त्यामुळे शेजारील लोक तिच्या खोलीकडे धावले. हे पाहून आरोपी तिथून निघून गेला. काही वेळाने घरी आलेल्या आईला पीडितेने सर्व हकिगत सांगितली.

सदर धक्कादायक प्रकार पाहून परिसरातील नागरिक प्रचंड संतापले. पीडितेच्या आईने जवाहर पोलीस स्टेशन गाठले आणि तेथे तक्रार दाखल केली. मात्र आरोपीला तत्काळ बेड्या ठोका, अशी मागणी करत जवाहर पोलीस ठाण्याबाहेर शेकडो लोक जमले. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जवाहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. त्यानंतर अवघ्या तासाभरात आरोपी मेहताला बेड्या ठोकण्यात आल्या.