कराड शहरातील घंटागाड्याचा बंद : ठेकेदारामुळे कराडकर वेठीस, कारवाईची गरज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड नगरपालिकेच्या कचरा गोळा करण्याचा ठेका असलेल्या ठेकेदाराची मनमानीपुढे कराडकर वेठीस धरले गेले. सकाळ- सकाळी पळणाऱ्या घंटागाड्या एका जागेवरच थांबवण्यात आलेल्या आहेत. दिवाळी सणाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याने तसेच गेले दोन वर्ष बोनस न मिळाल्याने आज घंटागाड्या जागेवरच उभ्या राहिल्या.

कराड नगरपरिषद स्वच्छ सुंदर शहर म्हणून देशपातळीवर झळकली आहे. यामध्ये स्वच्छता कर्मचारी व घंटागाडी कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. परंतु या घंटागाडी कर्मचाऱ्यांवर मात्र, मोठा अन्याय होत आहे. सदरचा अन्याय हा ठेकेदार करत असून कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक नगपालिका प्रशासनाला दिसत नाही का असाही सवाल आता उपस्थित होवू लागला आहे. ठेकेदाराने दोन वर्ष बोनस दिला नाहीच परंतु या कर्मचाऱ्यांचा पगारही थकवला जात आहे. तेव्हा या ठेकेदारावर आता कारवाई होणार की मागे तेच पुढे पहायला मिळणार.

शहरात रस्त्यावर कचरा पडू नये, म्हणून सकाळ- सकाळी घंटागाडी गलोगल्ली पळत असतात. परंतु आज केवळ नगरपालिकेच्या ठेकेदाराने आपली मनमानी केल्याने सर्व गाड्या यशवंतराव चव्हाण स्मृति सदन (टाॅऊन हाॅल) येते उभ्या राहिलेल्या आहेत. एकही गाडी बाहेर पडली नाही, त्यामुळे आता घरातील कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न नागरिकांच्या समोर उभा राहिला आहे. यावर मेहरबान जाब विचारणार की आता आपण माजी झालो म्हणून ठेकेदाराचे हित जोपासणार हे पहावे लागणार आहे. कराड शहरातील मेहरबान शहरातील प्रश्नांवर केवळ सत्तेत असतानाच किंवा निवडणूक जाहीर झाल्यानंतर जागे होणार असा सवाल आता सामान्य नागरिकांकडून विचारला जावू शकतो.

ठेकेदारावर कारवाई करणार 

नगरपालिका ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करणार आहे. लवकरच हा प्रश्न मिटवला जाईल. तसेच कराड शहरातील स्वच्छतेचे व कचरा गोळा करण्याचे कामही करून घेतले जाईल. नागरिकांची गैरसोय होवू दिली जाणार नाही. परंतु यामधील दोषीवर कारवाई केलीच जाईल, असे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले.