हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 निवडणुकीत महाविकास आघाडी एकजुटीने लढली तर लोकसभेला 40 आणि विधानसभेला 200 पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यानी हा दावा केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, कसबा काय किंवा चिंचवड काय… दोन्ही निवडणुकांनी धडे दिले आहेत. महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहिलो तर कसब्याचा निकाल लागतो आणि थोडं जरी इकडे तिकडे झालं एखादा बंडखोर.. एखादा घटक पक्ष बाजूला गेला तर चिंचवडप्रमाणे निकाल लागतो. हा दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी दिलेला हा धडा आहे. कसब्याचा हा निकाल हा नक्कीच महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. आणि 2024पर्यंत महाविकास आघाडीने मजबूतीनं एकत्र काम केलं, एकजूट दाखवली तर २०२४ साली विधानसभेत महाविकास आघाडीच्या 200 पेक्षा अधिक जागा निवडून येतील. लोकसभेला कमीत कमी 40 जागा आम्ही जिंकू. हे मी खात्रीने सांगतो, असं संजय राऊत म्हणाले.
चिंचवडचा विजय हा भाजपचा विजय आहे असं कोणीच मानणार नाही. चिंचवड मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जगताप पॅटर्न चालतोय. त्यामुळे चिंचवडचा विजय हा जगताप पॅटर्नचा विजय आहे. उमेदवार निवडताना आम्ही अधिक काळजी घेतली असती, बंडखोर कलाटे यांना आम्ही माघार घेण्यास लावू शकतो असतो तर नक्कीच आमचा विजय झाला असता असेही संजय राऊत यांनी म्हंटल.