हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
गोवा राज्याची जबाबदारी आमच्या नेत्यावर टाकल्यानंतर मी भेटायला गेलो होतो. तेव्हा साहेबांना म्हणालो की आम्हांला एखाद्या मतदार संघात काम करण्याची संधी मिळू दे. त्यावेळी साहेबांनी दया भाऊंच्या मतदार संघात जाण्याचे आदेश दिले. मलासुध्दा मनापासून आनंद या गोष्टीचा झाला, माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करून निवडूण आलेले आमदार कसे असतात हे बघता याव याच्यासाठी मी खास तुमच्या मतदार संघात गाठ घ्यायला आलो असल्याचे वक्तव्य भाजपा प्रदेश सरचिटणीस व कराड दक्षिणचे नेते डाॅ. अतुल भोसले यांनी केले.
मांद्रे (गोवा) विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अतुल भोसले पुढे म्हणाले, दयानंद भाऊ प्रत्येक माणसाला वाटते हा आपल्या कुटुंबातील माणूस आहे. माता- भगिनीला वाटते हा आपला भाऊच आहे. त्यांनी प्रत्येक गोष्ट नियोजन पूर्वक केलेली आहे.
https://twitter.com/Princy_Vishu/status/1492391526537707523
मांद्रे विधानसभा मतदार संघात लढत कोणा- कोणात
गोवा राज्यात विधानसभा 2022 निवडणुकासाठी रणसंग्राम जोरात सुरू आहे. या राज्यातील मांद्रे विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार दयानंद सोपटे आणि भाजपचे माजी मुख्यमंत्री व अपक्ष उमेदवार लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यात लढत होत आहे. 2017 साली लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा दयानंद सोपटे यांनी निवडणूकीत पराभव केला होता. तसेच सध्या चालू असलेल्या निवडणूकीत पार्सेकर यांना डावलेल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. तर पूर्वीचे काॅंग्रेसचे असलेलेल व 2017 साली भाजपमध्ये प्रवेश केलेले दयानंद सोपटे यांना उमेदवारी दिलेली आहे.
कराड दक्षिणेत व मांद्रेत काय साम्य
कराड दक्षिण मतदार संघात विद्यमान आ. पृथ्वीराज चव्हाण हे काॅंग्रेसचे माजी मुख्यमंत्री आहेत. तर डाॅ. अतुल भोसले यापूर्वी राष्ट्रवादी पक्षातून कराड उत्तर मतदार संघातून सातारा जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. तर गेल्या दोन टर्म माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात लढत दिली आहे. अशा परिस्थितीत माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारा आमदार कसा बघण्यासाठी गोव्यात गेल्याचे वक्तव्याने कराडच्या राजकीय नेत्याच्या व कार्यकर्त्याच्या मनात उखळ्या उडाल्या नाही तर नवलच.