हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धुव्वाधार पावसानंतर आता थंडीचा काळ सुरु झाला आहे. खरं तर उन्हाळा आणि पावसाळ्यापेक्षा हिवाळा लोकांना आवडतो. परंतु कडाक्याच्या थंडीमुळे त्वचा नाजूक होणे, ओठ फुटणे, त्वचा कोरडी पडणे अशा समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी जसे आपण थंडीत उबदार कपडे न चुकता घालतो त्याचप्रमाणे त्वचेची त्वचेची सातत्याने काळजी घेणे आणि निगा राखणे आवश्यक आहे. आज आपण अशाच काही उपायांबाबत जाणून घेऊया ज्याद्वारे तुम्ही थंडीतही आपली त्वचा चांगली ठेऊ शकता.
त्यासाठी रोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा . चेहरा धुताना फेसवॉशचा वापर करा. थंड पाण्याचा वापर चेहरा धुण्यासाठी केल्याने त्वचा कोरडी पडते त्यामुळे चेहरा धुताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा.
आंघोळीनंतर टॉवलेने त्वचा खसाखसा पुसू नये. ओलसर त्वचेवरच चांगल्या प्रतीचे मॉइश्चरायझर, शेंगदाणा तेल लावावे. तेलाशिवाय, पाणी व ग्लिसरीन समप्रमाणात एकत्र करून ते आंघोळीनंतर लावल्यासही अपेक्षित परिणाम लक्षात येतो.
थंडीमुळे ओठ फुटण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी ओठांना लीप लोशन किंवा लीप बाम लावून घराबाहेब पडावे. त्याचप्रमाणे तुम्ही लोणी, दुधाची साय अथवा गावरान तूपदेखील ओठांना लावू शकता. फुटलेल्या ओठांवर कधीही जीभ फिरवू नये कारण थुंकीत असणारे Enzymes त्रास वाढवतात .
घरात किंवा बाहेर जाताना चप्पलचा वापर करा. थंडीत आदीच पायाला भेगा पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे घरातही शक्यतो स्लीपरचा वापर करावा.
थंडीत पाय कोरडे पडत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने लोशन किंवा क्रिम लावावी.