व्यवसायाच्या नैराश्येतून पोलिसाच्या पतीची गळफास लावून आत्महत्या

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगलीतल्या यशवंतनगर येथील वसंतदादा कुस्ती केंद्राच्या पाठीमागे राहणार्‍या पोलीस महिलेच्या पतीने व्यवसायात यश येत नसल्याने आलेल्या नैराश्येतून राहत्या घराच्या लोखंडी जिन्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. जितेंद्र शहाजी पाटील असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सदरची घटना हि बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

पाटील यांनी आत्महत्येपूर्वी एक चिट्ठी लिहिली होती. ती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यानुसार व्यवसायाच्या नैराश्येतून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेची नोंद संजयनगर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मृत जितेंद्र पाटील यांचा दूध संकलनाचा व्यवसाय गावामध्ये आहे. त्यांच्या पत्नी संजयनगर पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत आहेत.

सध्या पाटील हे कुटुंबियांसह यशवंतनगर येथील एका घरामध्ये भाड्याने राहत होते. गेल्या काही दिवसांपासून पाटील हे व्यवसायात यश मिळत नसल्याने चिंतेत होते. बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ते व्यायामाला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले. लोखंडी जिन्याच्या अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.