औरंगाबाद – पिसादेवी गावाच्या पुलाखालून वाहणाऱ्या पाण्यावर एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचा प्रकार काल सकाळी काही नागरिकांच्या लक्षात आला. नंतर चिकलठाणा पोलिसांनी मृतदेह आला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर हा मृतदेह रामचंद्र रमेश जायभाये (रा. पिसादेवी रोड, हर्सुल) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्यांचा काटा काढला असल्याचा गुन्हा चिकलठाणा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
चिकलठाणा पोलिस ठाण्यात मृताचे भाऊ कृष्णा जायभाये यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रामचंद्र हे खाजगी गाडीवर चालक म्हणून नोकरी करत होते. ते औरंगाबादला आईसाहेब नगर येथे सासू हिराबाई घुगे यांच्या इमारतीमध्ये पत्नी मनीषा व दोन वर्षाचा मुलगा अथर्व यांच्या सोबत राहत होते. रामचंद्राच्या पत्नीचे त्यांचा मित्र गणेश फरकाडे (रा. बनकिन्होळा, ता. सिल्लोड) त्याच्यासोबत अनैतिक संबंध होते. यामुळे रामचंद्र यास दारूचे व्यसन लागले होते या संबंधात अडसर ठरत असल्यामुळे रामचंद्र यांचा खून मनीषा व तिचा प्रियकर गणेश या दोघांनी केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या दोघांच्या विरोधात चिकलठाणा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा काल रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, काल सकाळी पिसादेवी गावाच्या पुलाखालून वाहणाऱ्या पाण्यावर एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर चिकलठाणा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन जाधव यांनी सहकाऱ्यांसह मृतदेह ताब्यात घेतला असता मृताच्या खिशात आधार कार्ड आढळले. ही माहिती मृताच्या भावाला देण्यात आल्यानंतर कुंभेफळ येथून ते आल्यानंतर मृतांची ओळख पटली. मृत रामचंद्र यांच्या मानेवर मोठी जखम आहे. याप्रकरणी अधिक तपास फौजदार ढगारे करीत आहेत.