त्यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल अशी आशा… ‘तौक्ते’ वरून रोहित पवारांची फडणवीसांकडे मागणी

rohit pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नुकत्याच राज्यात येऊन धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टी आणि मुंबईसह राज्यातील इतर भागांमध्ये देखील मोठे नुकसान झाले आहे. मात्र यानंतर महा विकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. आता यावरूनच राजकीय आरोप-प्रत्यारोप होतानाचे चित्र राज्यामध्ये पाहायला मिळत आहे. कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी देखील नुकसान ग्रस्त भागातील पाहणी वरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. ‘ राज्य सरकार नुकसानग्रस्तांना मदत करेलच मात्र केंद्राकडून राज्याला मदत मिळवण्यासाठी फडणवीस यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल अशी अपेक्षा आहे’ असं आमदार रोहित पवार यांनी बारामती इथं पत्रकारांशी बोलत असताना आपलं मत व्यक्त केले आहे.

इतर नुकसानग्रस्त राज्यांनाही आशा

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, ” नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने गुजरात आणि महाराष्ट्रसह इतर दोन राज्यातही मोठे नुकसान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानातून गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि मदतही फक्त गुजरात राज्यासाठी जाहीर केली आम्ही सर्व आशावादी आहोत की महाराष्ट्रासह इतरही दोन राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

त्यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले महाविकास आघाडी सरकार बरोबरच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे राज्य सरकार तर नुकसानग्रस्तांना मदत करेलच मात्र केंद्राकडून राज्याला मदत मिळवण्यासाठी फडणवीस यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल असंही रोहित पवार म्हणाले आहेत.