2024 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास मी फाशी घेईल; संतोष बांगर यांचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सतत रोखठोक विधाने करणारे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा एक मोठे विधान केले आहे. “2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले नाही तर मी फाशी घेईल” असे विधान संतोष बांगर यांनी केले आहे. बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला. या निकालानंतर हिंगोलीत एकनाथ शिंदे समर्थकांनी जल्लोष साजरी केला. यावेळी बोलतानाच, मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास मी फाशी घेईल असे संतोष बांगर यांनी म्हटले.

शिंदे गटाच्या बाजूने विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिल्यानंतर संपूर्ण राज्यभरात शिंदे समर्थकांनी जल्लोष केला. यावेळी हिंगोलीतही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी बोलताना संतोष बांगर म्हणाले की, “माझा जो कडवट शिवसैनिक आहे, त्या शिवसैनिकाला फक्त धनुष्यबाण लागतो. मग हे म्हणतील आमच्याकडे मशाल आहे, कुणी म्हणेल आमच्या कडे अमकं आहे, कुणी म्हणेल तमकं आहे. काही म्हणतील, पण याचा कुठलाही फरक पडत नाही आणि आज महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे”

त्याचबरोबर, “छाती ठोकून जसं सकाळी सांगितलं होतं की, निकाल हा आमच्याच बाजूने लागणार आहे. आजही मी तुम्हाला सांगतो, आता एप्रिलमध्ये येणारी जी लोकसभेची निवडणूक आहे, छाती ठोकून सांगतो की, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीच होणार. जर नरेंद्रभाई या देशाचे पंतप्रधान झाले नाही, तर हा संतोष बांगर भर चौकात फाशी घेईन. या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी झाल्याशिवाय राहणार नाही” असे संतोष बांगर म्हणाले.

दरम्यान, बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल दिला. हा निकाल त्यांनी शिंदे गटाच्या बाजूने दिला. तसेच दोन्ही गटातील आमदार हे पात्र असल्याचे देखील जाहीर केले. मात्र शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागल्याने याचा मोठा धक्का ठाकरे गटाला बसला आहे. त्यामुळे आता ठाकरे गट पुढे कोणती पाऊले उचलेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.