नवी दिल्ली । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे काही दिवसांपूर्वी राज्यसभेतून निवृत्त झाले. त्यांच्या निरोप समारंभावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुलाम नबी आझाद यांच्या कामाचं कौतुक केले होते. इतकचं नव्हे तर एका घटनेचा उल्लेख करत मोदींना अश्रूही अनावर झाले. पंतप्रधानांसोबत भाजपाच्या अनेक नेत्यांनी आझाद यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. यानंतर गुलाम नबी आझाद हे भाजपात प्रवेश करतील असं सांगितलं जात होतं, परंतु या सर्व चर्चेवर खुद्द आझाद यांनी भाष्य करत त्यावर मौन सोडलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आझाद यांनी भाजप प्रवेशावर खुलासा केला आहे.
या मुलाखतीत आझाद यांनी सांगितले की, ”ज्यादिवशी काश्मीरमध्ये काळा बर्फ पडेल त्यादिवशी मी भाजपात प्रवेश करेन, फक्त भाजपाच नाही तर अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करू शकतो, जे लोक अशाप्रकारे अफवा पसरवत आहेत त्यांना माझ्याबद्दल काही माहिती नाही”, असा खुलासा आझाद यांनी केला.
निरोपावेळी काँग्रेस पक्षाने दिलेल्या प्रतिक्रियेवर आझाद म्हणाले की, पक्षाच्या अध्यक्षांनी माझ्या कामाची प्रशंसा केली. आता आपल्याला पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी मिळून काम करायचं आहे असं सांगितले, त्यानंतर मी सोनिया गांधी यांची भेट घेतली, तेव्हा निवडणुकीसाठी तयार राहण्याचं त्या म्हणाल्या.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.