हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना केला असता त्यांनी साद घातली तर बघू असं उत्तर दिल्याने चर्चाना उधाण आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांना विचारलं असता त्यांनीही सूचक विधान केलं आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर आपल्याला आनंदच होईल असं त्यांनी म्हंटल. शिवसेना दिवा शहरच्यावतीने रविवारी दिवा येथे शिवसैनिकांचा संवाद मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भास्कर जाधव म्हणाले, शर्मिलाताई ठाकरे काय बोलल्या हे मी ऐकले नाही. दुसरी गोष्ट कोणाच्या घरगुती विषयावर बोलणं हे आमच्या सारख्या माणसांना योग्य नाही. पण आज ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना सगळ्या बाजूने घेरण्याचा जो प्रयत्न सुरू आहे. त्यावेळेला त्यांच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा राहू पाहतोय. अशा वेळेला जर त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक कुठल्याही प्रकारचा पूर्वीचा राग, लोभ मनात न ठेवता याप्रसंगामध्ये जर उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहिले. तर त्यांचा निश्चितपणे माझ्यासारख्या सामान्य माणसाला आनंदच होईल.
शर्मिला ठाकरे नेमकं काय म्हणाल्या-
पुण्यात “गणपती आमचा किंमत तुमची 2022 या मनसेने केलेल्या आयेजित उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी पत्रकारांनी शर्मिला ठाकरे यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकत्र येणार का यावर प्रश्न विचारला. यावेळी त्या म्हणाल्या साद घातली तर येऊदेत. मग बघू त्यानंतर,… शर्मिला ठाकरे यांच्या या विधानाने खरंच भविष्यात शिवसेना- मनसे एकत्र येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.