अजितदादांना अर्थखाते द्यायचं नसेल तर मुख्यमंत्रीपद द्या; दिल्लीने आदेश देऊन शिंदे गटाला परत पाठवलं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या कित्येक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्यात शुक्रवारी मंत्रिमंडळाचे खातेवाटप करण्यात आले . काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटपाची यादी जाहीर केली आहे. मात्र या खातेवाटपानंतर शिंदे गट नाराज झाल्याच्या चर्चा राजकिय वर्तुळात रंगल्या आहेत. कारण, कोणत्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखाते देण्यात येऊ नये अशी मागणी शिंदे गटाने केली होती. परंतु तरी देखील अर्थखाते अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. यासाठी शिंदे गटाने दिल्लीपर्यंत जाऊन प्रयत्न केले. मात्र याचा काही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. या सर्व घडामोडींनंतर दिल्लीत झालेल्या चर्चेसंदर्भात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काही गौप्यस्फोट केले आहेत. यामध्ये त्यांनी दिल्लीने शिंदे गटाची मागणी धुडकावून लावली असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे.

सध्या संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळीच पत्रकारांशी बोलताना, “दिल्लीने शिंदे गटाचे काही ऐकले नाही. उलट राहायच असेल तर राहावा नाही तर जावा असं त्यांना सांगण्यात आलं. अर्थ खात अजित पवार यांना द्यायच नसेल तर तुम्ही मुख्यमंत्री पद त्यांना द्या. असा प्रस्ताव शिंदे गटाला दिल्लीने दिला. यावरुन शिंदे गट शांत झाला आणि मागे आला ही माझी पक्की माहिती आहे असं संजय राऊत यांनी म्हंटल.

आता अर्थ खात्याचा कौल अजित पवार यांच्या बाजूनेच पडला आहे. तो त्यांच्याकडेच राहणार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. राऊत पुढे म्हणाले, शिंदे गट आणि अजित पवार गटात जमीन आसमानचा फरक आहे. त्यांच्या गटात अनेक तालेवार नेते आहेत. त्यांनी अनेक वर्ष मंत्रीपद भोगलं आहे. अजित पवार यांचा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा नाही. महाराष्ट्राच भल होणार नाही. तरीही अजित पवारांचा अनुभव दांडगा आहे. शिंदे गटाचे महत्व फक्त शिवसेना फोडण्यापुरत होत. आता त्यांचे महत्त्व संपलं आहे.” अशी खोचक टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे.

शिंदे गट हा राज्यकर्ता पक्ष नाही. त्यामुळे येतील तसे जातील. अजित पवारांचा गट सत्तेत फार काळ राहील अस वाटत नाही. भाजपच धोरण वापरा आणि फेका राहिल आहे. भाजपने देशातील अनेक पक्ष वापरले आणि फेकले. दोन्ही गटाची अवस्था त्यापलीकडे होणार नाही असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.